कोपरखैरणेत सिंगल यूज प्लास्टिकच्या खुल्या विक्रीविरोधात कोपरखैरणे काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष सुनील पारकर यांची कृती.
नवी मुंबई, २५ मे २०२५: कोपरखैरणे परिसरात सिंगल यूज प्लास्टिकच्या सर्रास वापरावर आणि खुल्या विक्रीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अधिसूचनेचे उल्लंघन होत असल्याने कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष आणि पर्यावरणप्रेमी समाजसेवक सुनील पारकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी कोपरखैरणे वार्ड अधिकाऱ्यांना पुराव्यासह पत्र लिहून सिंगल यूज प्लास्टिकच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल यूज प्लास्टिक जसे की, प्लास्टिकचे चमचे, आईस्क्रीमच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे आणि ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. मात्र, कोपरखैरणे परिसरात दुकानदार आणि व्यापारी हे नियम धाब्यावर बसवून खुलेआम या वस्तूंची विक्री करत आहेत.
यामुळे पर्यावरणाला गंभीर हानी पोहोचत आहे.
समाजसेवक सुनील पारकर यांनी पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पाऊल उचलत नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे वार्ड अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी सिंगल यूज प्लास्टिकच्या विक्रीचे पुरावे सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. “पर्यावरणाचे रक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सिंगल यूज प्लास्टिकमुळे प्रदूषण वाढत आहे. यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असे पारकर यांनी सांगितले.
या पत्रामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला असून, कोपरखैरणे परिसरात सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी तात्काळ कारवाई होण्याची अपेक्षा आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही सुनील पारकर यांच्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे....
Comments
Post a Comment