लेखिका मानसी चापेकर यांच्या लेखणीतून - असमाधानी समाधान


#असमाधानी_समाधान लेखिका= मानसी चापेकर
पूर्वी मोठी माणसं म्हणायची की अंथरूण पाहून पाय पसरावेत ..मात्र हल्ली म्हटलं जातं की कधीतरी अंथरूण ही मोठे करा की!!

म्हणजे पूर्वी मोठी माणसं आपल्याला समाधानी रहा हे समजावून सांगायची आणि आता मात्र माणसांच्या गरजाच इतक्या वाढल्या आहेत ...की त्यांनी स्वतः वाढवल्या आहेत माहीत नाही.

पूर्वी दोन खोल्यांमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीत आठ आठ नऊ नऊ माणसं सुद्धा राहायची आणि आजकाल नवरा बायको, त्यांचा एक मुलगा किंवा मुलगी किंवा जास्तीत जास्त दोन मुलं यांसाठी पाच-सहा खोल्या असतात. 

लहानपणापासून (हो कारण सासू-सासरे वगैरे सोबत नकोच असतात एक तर ते वेगळे असतात किंवा वृद्धाश्रमात) त्या मुलांना स्वतंत्र बेडरूम दिली जाते मग त्यांना सवय होते एकटेपणाची... मग त्यांना सवय होते सगळं काही स्वतःपुरतं ठेवायची.

आपल्याला आजकाल कितीही मिळालं तरी समाधान होतच नाही.माझी आई म्हणायची की पन्नास हजार रुपये पगार सुद्धा कमी पडेल आणि 5000 सुद्धा पुरेल अशी असते एकेकाची परिस्थिती. आपल्या नेमक्या गरजा काय आहेत ...एखादी वस्तू आपल्याला अगदीच तातडीची आहे का... ही असते गरज ...पण माझ्याकडे आहे आणि मला अजूनही हवं आहे ही असते हाव.
पैसा कमवावा ...आपल्या इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांसाठी ...परंतु जिथे हाव येते तिथे आपण ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी केलेली तडजोड जी चुकीची असू शकते ..केलेले कष्ट जे आपल्या शरीराला ,मनाला घातक ठरू शकतात हे सगळे येते.

हे आपलं आयुष्य आहे आपण किती गोष्टी मिळवाव्यात त्या मिळवलेल्या साठवाव्यात आणि त्या साठवलेल्या पुरवाव्यात हे आपल्यावर असते. आयुष्यभर पैसा कमवत कमवत आपले आयुष्य त्याच्यासाठीच खर्ची घालायचे आहे की कमावलेले पैसे आपलं आयुष्य पूर्णपणे उपभोगण्यासाठीही खर्च करायचे हे आपण ठरवायला हवं. कपडे. दागिने ...प्रॉपर्टी.. या सगळ्यात इन्व्हेस्ट करताना जो आनंद मनाला सुखावेल ... ज्या आनंदाची साठवण करून आपण आयुष्यभर तो आनंद रोजच्या रोज उपभोगू शकू अशा गोष्टींमध्ये सुद्धा इन्वेस्टमेंट करणे गरजेचे आहे.
कधीतरी पाय पसरण्यासाठी पांघरून जरी मोठे केले तरी ते पांघरून किती वेळा आणि किती मोठे करायचे हे आपल्या हातात आहे ....यासाठीच ही म्हण मोठ्यांनी तयार केली आहे की अंथरूण पाहून पाय पसरावे जिथे आपल्याला समाधानी राहण्यास सुचवले आहे.

हे समाधान केवळ या भौतिक गोष्टी पुरतेच नाही तर अनेक बाबतीत लागू पडते. फक्त ही समाधानाची व्याख्या प्रत्येकाने आपापल्या आयुष्यासाठी वापरून प्रत्येक गोष्टीचे समाधान.. आपल्या पुरते तरी सेट करायला हवे आहे.

मानसी चापेकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..