बहुगुणी व्यक्तिमत्व लेखक घनश्याम परकाळे यांच्या लेखणीतून वाचा "प्रथम दर्शनी सिंगापूर" प्रवासवर्णनीय लेख आणि कविता..
प्रथम दर्शनी सिंगापुर
एकही भटका कुत्रा नाही!
सगळेच भटके कुत्रे गेले कुठे?
एकही चिमणी दिसली नाही!
सगळ्याच चिमण्या गेल्या कुठे?
एकही कबुतर दिसलं नाही!
सगळीच कबुतरं गेली कुठे?
नव्हे नव्हे,
तसा एकही पक्षी दिसला नाही!
सगळेच पक्षी गेले कुठे?
एक एकही कावळा दिसला नाही!
सगळेच कावळे गेले कुठे?
कचरा नाही, तर कावळा नाही..
लौकिकार्थाने शोध शोधून पाहिलं!
पण..कस्पटभर कचरा दिसला नाही.
नवीन सँडलला झाला हप्ता, तरी..
तळव्याला टीचभर माती लागली नाही!
एकही होर्डिग, एक बॅनर दिसलं नाही!
सगळेच बॅनर गेले कुठे?
धर्माला इथल्या पेहराव नाहीत!
बाजाराला अस्मितेची हावचं नाही?
वायर्सची जळमट लटकली नाहीत!
आकाशी कोळीष्टक गिरबटली नाहीत.
रस्ते सुसाट, पोलीस मात्र एकही नाही..
स्वयंशिस्त इथला शिरस्ता!
पोलीसाची इथं गरजच कुठे?
कर्णकर्कश गोंधळ नाही, सारे शांत शांत,
जणू इथं गाडीला हॉर्न नाही!
गाड्यांचे हॉर्न गेले कुठे?
क्षणात सरसर, क्षणात फिरुणी उन पडे!
उबदार गारवा लपंडाव घडे,
निसर्ग हिरवा नेत्र सुखावे!
सुनसान रस्ते, तुरळक गाड्या,
रस्त्यावर फिरताना गार्डनचा फील!
सगळे सगळेच थबकले कुठे?
एलईडी साईनबोर्ड, मिनिटाचा डिस्प्ले,
वेगाची गॅरंटी, किलोमीटरला सुट्टी.
अंतर दुय्यम, वेळेचे मोजमाप,
टॅक्सीचे चार्जेस, मिनिटाचे डॉलर!
भूलभुलैया काही अस्सल काही नक्कल,
मोहवते सैर, हा तर माया बाजार!
स्कायस्क्रॅटर बँका, उंची इलीट ब्रँड
बिझनेस हब, मरिना बे सँड्स-कॅसिनो भरार!
इथं तर म्हणे,
जरुरी नाही कडीकुलुप!
चोरी करणारा चोर,
नाही म्हणे पुन्हा इथं दिसत कधीच!
अहो आहे, ही वसाहत हाकेसरशी,
असेल का हो शिंगणापुरची?
थांबा जराशी होतेय का हो घाई?
जरा, स्पेलिंग मिस्टेक झाली कशी!
आहे, म्हणे ही कथा सिंगापुराची...!!
सिंगापुराची...!! - घनश्याम
मी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर होतो आणि अजुनही माझी सेवानिवृत्ती पूर्वीची 'बकेट लिस्ट' पुर्ण झाली नव्हती. बरेच दिवसापासून राहिलेली इच्छा म्हणजे नुकताच मनासारखा कॅमेरा विकत घेतला होता आणि त्यातून झालेली निसर्ग भ्रमंती सोशल मिडियावर लोकप्रिय होत होती. जीवनात असा सगळा आनंदी आनंद भरुन राहिला असताना एक गोष्ट मात्र राहून गेली होती. ती परदेश वारी! माझा परदेश प्रवासाचा सिलसिला सेवानिवृत्त होण्याअगोदर सुरु व्हावा असे वाटत असतानाच एक संधी आली आणि मी मयुरेश ट्रॅव्हल मधून मनोहर परब टोकियोकर यांच्या सोबत सिंगापूर ला जाऊन आलो सुध्दा!
सिंगापुर एक आखिव रेखीव आणि शांत शहर आहे. मुंबई पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या या बेटावरची लोकसंख्या आहे फक्त ५५ लाख! इथं फिरण्यासारखं खूप काही आहे. संतोषा आयलँड येथे आपल्या इमॅजिका प्रमाणे मल्टी गेमिंग ऑप्शन्स असलेल युनिवर्सल वर्ल्ड आहे. त्यामधे ट्रान्सफॉर्मर्स, ममीज् , ज्युरॅसिक पार्क, धडकी भरवणाऱ्या मोठमोठ्या रोलर कॅस्टल, वगैरेसह इंडियन फुड रेस्टॉरंट्स आहेत. हे पहायला पूर्ण दिवस जातो आणि थकायला होतं. थोडी आणखी उर्जा शिल्लक असेल तर संतोषा आयलंड येथील जायंट एक्वारियम पहायलाच हवं. चायना टाऊन परिसरात खाण्यापिण्यासह चायनीज वस्तु शॉपिंग चा आनंद घेता येतो. तसेच भगवान गौतम बुद्धाचा दात जपुन ठेवलेले इथ असलेले बुध्द मंदिर आणि म्युझियमची आकर्षक वास्तु अनुभवायला हवी.वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा प्राप्त झालेल्या बॉटनिकल गार्डन मधे विविध प्रकारच्या वृक्ष वेली आणि वनस्पतींचे चांगलेच जंगल तयार झाल आहे. 'गार्डन बाय द बे' या नेचर पार्क मधे १०१ हेक्टर्स जमीनीवर इनडोअर गार्डन वसवले आहे. क्लाऊड फॉरेस्ट या वस्तुमधे प्रचंड उंचीचे म्हणजे साधारण पस्तीस फुट उंच अंडाकृती ग्लास ग्रीन हाऊस डोम बनवले आहेत. सहामजली इमारतीमधील नियंत्रित थंडगार वातावरणात आकर्षक सजावटी सह ट्री टॉप वॉक मुळे वेगवेगळ्या वृक्ष, वेली आणि लोटणारा मोठा धबधबा बर्ड आय व्ह्युव प्रमाणे निरखता येतो. अबालवृध्दांची मने लुभावणारा हलताबोलती अवतार मुर्ती मुद्रा साकारणारा एक आकर्षक कक्ष इथं आहे. शेजारीच असलेल्या फ्लॉवर डोम ला ही भेट द्यायला हवी. हे जगातील सर्वात भव्य असे ग्रीन हाऊस आहे. इथ थंडगार नियंत्रित वातावरणात हजारो, लाखो प्रकारच्या नेत्रसुखद फुलांची आणि फुलझाडांची लागवड केलेली आहे. सिंगापूर झू म्हणजेच प्राणिसंग्रहालयात जगभरातील पक्षी व प्राणी वावरताना दिसतात. कुठल्याही पिंजर्याशिवाय उघड्यावर संचार करणारे अगदी पंधरा वीस मीटर दूरवर असलेल्या हिंत्स्र पांढरा वाघाची जोडी, सिंहाची जोडी, खुँखार जंगली कुत्र्यांची झुंड पहाताना भीती तर वाटतेच आणि कुतुहल जाग होत, खरं. पण हे खरयं का? हे असं कसं शक्य आहे? तर या प्रश्नाला उत्तर येते... की ती हिंत्स्र श्वापदे आणि आपल्यामधे दहा पंधरा मिटरचा पाण्याने भरलेला उभा खंदक आहे. त्यामधून वाघ अलिकडे येऊ शकत नाही. त्यामुळे पहायला येणाऱ्या माणसांवर तो हल्ला करु शकत नाही. परंतु हे समर्थन पटणारे नाही... माझ्या मते, कदाचित हे पशु पक्षी प्रशिक्षित असावेत किंवा त्यांना गुंगीच्या अमलाखाली ठेवलं जात असावं, असो. झू मधील अशाच एका नियंत्रित थंडगार डोम मधे पांडा या लोकप्रिय प्राण्यासोबत विविध प्रकारचे पक्षी किलबिलतात आणि माकडे चित्कारत असतात. तसेच मानवाचा पूर्वज ओरंगटँग, चिपांजी, गेंड्याची पूर्ण जमात, जिराफ, झेब्रा वगैरे प्राणी उघड्यावर दृष्टीस पडतात. प्रत्यक्षात कोणत्याही पिंजऱ्याशिवाय आजूबाजूला मोठ्या संख्येने फिरणारी ही जंगली श्वापदे, पशुपक्षी पाहून लहान मुले हरखून जातात आणि थोरांना मात्र कोड्यातच टाकतात!मरीना बे, सिंगापूर हे ठिकाण सिंगापुराच्या दक्षिणेस असलेली खाडी आहे. ऐतिहासिक महत्त्वाची सिंगापूर नदी येथे समुद्रास मिळते. हाच परिसर सिंगापुर शहराचे व्यावसायिक आर्थिक केंद्र तर आहेच शिवाय नाईट लाईफ, शॉपिंग, कॅसिनो अशा विविध पर्यायासह पर्यटकांना आकर्षित करणारा हॅपनिंग प्लेसेसची रेलचेल असलेला आकर्षक मानबिंदु आहे. बे फ्रंट या एमआरटी मेट्रो स्टेशन जवळ असलेलं मरिना बे सँड्स हे ५५ मजल्यांचे ३ टॉवर्सचे सप्त तारांकित हॉटेल आहे. तीन्ही टॉवर्सचे टेरेस जोडणारे जहाजाच्या आकाराचे रुफ टॉप गार्डन आहे. येथील शॉपिंग मॉलमधे मोठमोठाल्या ब्रँडची दुकाने थाटली आहेत. झगमगीत मॉल, मोठ्ठाली झुंबरे, पाण्यामधील गोलाकार ॲपल च शोरूम, लुईस व्ह्युँटन या इंटरनॅशनल ब्रँडच्या दिलखेचक वास्तु सहित शेजारीच असलेल आर्ट अँड सायन्स म्युझियम, सिंगापुर दर्शन घडवणारा फिरता पाळणा अर्थात सिंगापूर रिंग, भला भव्य कॅसिनो म्हणजे जुगारी अड्डा, सिंगापुर नदीच्या पार्श्वभूमीवर सभोवताली आकाशाला गवसणी घालणाऱ्यां डौलाने उभ्या असलेल्या जगभरातील नामवंत बँकाच्या गगनचुंबी टॉवर्स आणि कार्पोरेट इमारतींच्या भव्य दर्शनानेच सिंगापुरचे जागतिक अर्थ जगतामधील आकाशरेखी स्थान महात्म्य मनावर कोरले जाते. ही 'इकॉनॉमिक स्कायलायनर' येऊन पोहचते ती 'मेर-लायन' या सिंह व मासा यांचा संगम असलेल्या सिंगापुर देशाच्या भाग्य प्रतिकाच्या मुर्तीपाशी! याच खाडीकाठी वसवलेल्या या मेर-लायन च्या मुखामधून अखंडित जलाभिषेकाचा ओघ प्रसवणारा हा पांढराशुभ्र सिंह जागतिक अर्थनगरीचा अनभिषिक्त सम्राट म्हणून मिरवतो आहे. गंमत म्हणजे इथल्या मरिना बे सँड्स या सेवन स्टार हॉटेलात साधा सिक्युरिटी गार्ड नाही आम्ही इथल्या लॉबीत आरामशीर बसून आमच्याकडील कोल्हापूरी भडंग खाल्ले. कोणीही हटकले नाही. अट एकच, कचरा करायचा नाही. हेच भडंग मुंबई मधील ताज पॅलेस हॉटेल मधे खाणं शक्य आहे का? अहो खाणं तर सोडाच, तिथला दरबान तुम्हाला हॉटेल च्या जवळपास फिरकू देणार नाही, हुसकावून काढेल, असो. इथंच पाण्याच्या काठावर रात्री नयनरम्य लेजर शो विनामुल्य पहायला मिळतात. थोडसं पुढे मरिना बे सँड्स हॉटेलच्या समोरच सुपर ट्री समुहाचा सुमारे पंधरा-वीस मिनिटांचा विविध रंगी प्रकाश किरणांची मुक्त उधळण करणारा म्युझिक ॲड लाइटचा नाईट शो पाहून डोळ्याचे पारणे फिटते.
अशातच सिंगापुर च्या लहरी वातावरणामुळे आलेल्या गडगडाटी पाऊसधारांमुळे याच मरिना बे सँड्स हॉटेलवरील टेरेस गार्डन ची एंट्री ऐनवेळेस बंद झाली आणि ५५ व्या मजल्यावरुन सिंगापुर न्याहाळण्याचे आमचे स्वप्न अपूर्णच राहिले. या आनंदाला आम्ही मुकलो. कदाचित पुन्हा सिंगापुर फेरी व्हावी आणि हे अधुरे स्वप्न पुर्ण करता यावे म्हणून निसर्गाची ती योजना असावी. थोडक्यात काय तर या शांत शहराला आवर्जून भेट द्यायला हवी. का? तर तेथे हॉगकॉग येथून आलेल्या परदेशी पर्यटकाचे मत फार बोलके आहे. "रुक्ष व बीझी हाँगकाँग पेक्षा सिंगापूर ही सुबत्ता असलेली, खूप शांत आणि कुल कंट्री आहे." म्हणून मुले आणि कुटुंबासहित फिरणे व आराम करण्यासाठी त्याने सिंगापूरला पहिली पसंती दिली होती. आता या शांत शहराच्या सुबत्तेच रहस्य काय? खरंतर श्रीलक्ष्मी आणि शांतता एकत्र नांदतात, असं सहसा दृष्टीस पडत नाही. तरीही सिंगापुर देशात श्रीलक्ष्मी आणि शांतता गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात, हे सत्य आहे. हा दुर्मीळ योग कसा जुळून आला आहे? हे तर जाणून घ्यायलाच हवे... परंतु ते पुढील भागात!
क्रमशः
( कलाप्रेमी लेखक घनश्याम परकाळे हे नेरूळ नवी मुंबई प्रांतातील बहुगुणी व्यक्तिमत्व आहेत. लेखन सूत्रसंचालन चित्रपट दिग्दर्शन फोटोग्राफी अशा विविध कलांमध्ये त्यांनी हातखंडा मिळवलेला आहे घनश्याम परकाळे यांच्यासारखे व्यक्तिमत्व नेरूळ नवी मुंबई परिसराला मिळाले हे नेरूळकारांचे भाग्य आहे)
Comments
Post a Comment