श्रीगणेशोत्सव सुव्यवस्थित संपन्न होण्याकरिता नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांचे सर्व यंत्रणाना दक्षतेचे निर्देश
नवी मुंबई - महानगरपालिका क्षेत्रातील श्रीगणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस यंत्रणा यांच्यासह सर्व प्राधिकरणे सज्ज झाली असून परस्पर समन्वय राखून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले.
‘श्रीगणेशोत्सव 2023’ च्या पार्श्वभूमीवर नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनविषयक बैठक महापालिका मुख्यालयात संपन्न झाली. यावेळी आयुक्तांनी प्रत्येक बाबीचा बारकाईने आढावा घेत तत्पर कार्यवाहीचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार तसेच परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त श्री. विवेक पानसरे व वाहतुक पोलीस विभागाचे उपआयुक्त श्री. तिरूपती काकडे तसेच संबंधित विभागप्रमुख, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी उपस्थित होते.
यामध्ये मंडपासाठी ऑनलाईन परवानगी अर्ज दाखल करणा-या मंडळांचा आढावा घेताना अर्ज भरणा मुदतीच्या अखेरच्या दिवसापर्यंत दाखल झालेल्या 205 अर्जांपैकी 138 मंडळांना आत्तापर्यंत परवानगी देण्यात आलेली असून 26 अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच 41 अर्ज प्रलंबित असल्याची माहिती घेतल्यानंतर आयुक्तांनी प्रलंबित अर्जांची परवानगी प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे कोणतेही मंडळ परवानगी मिळाली नाही म्हणून उत्सव साजरा करू शकले नाही असे होऊ नये याची खातरजमा करून घ्यावी असेही आयुक्तांनी विभाग अधिकारी यांस निर्देश दिले.
Comments
Post a Comment