रविवारी 17 सप्टेंबरला नवी मुंबईत आठही विभागांत हजारो विद्यार्थी व नागरिक घेणार स्वच्छतेची शपथ
नवी मुंबई- 'इंडियन स्वच्छता लीग' मध्ये मागील वर्षी सर्वाधिक युवक सहभागाबद्दल देशात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविणारे शहर म्हणून नामांकित नवी मुंबई शहर यावर्षीही इंडियन स्वच्छता लीग 2.0 मध्ये सहभागासाठी नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झालेले आहे.
याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचा नवी मुंबई इको नाईट्स हा संघ कर्णधार पद्मश्री शंकर महादेवन यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झालेला असून नागरिक https://innovateindia.mygov.in/islseason2/ या लिंकवर क्लिक करून नवी मुंबईच्या संघातील सहभाग नोंदवित आहेत.
लीग अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून त्यामध्येही नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे. नमुंमपा आणि खाजगी शाळांमध्ये शुक्रवारी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत 431 शाळांमधील 1 लाख 83 हजार 144 विदयार्थ्यांनी सहभागी होत विक्रम नोंदविलेला आहे. या विक्रमाची नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मध्ये घेण्यात आलेली आहे.
स्वच्छ शहर ही नवी मुंबईची ओळख येथील स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण देशात दृढ झालेली आहे. त्या अनुषंगाने ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’ अंतर्गत संपूर्ण नवी मुंबई शहरात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी यादृष्टीने रविवार, दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी, बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात नागरिक एकत्र जमून स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करणार आहेत. या माध्यमातून स्वच्छतेविषयी नवी मुंबईकर नागरिक किती जागरूक आणि उत्साही आहेत याचे प्रत्यंतर येणार आहेच त्यासोबतच नवी मुंबई शहरातील एकात्म भावनेचेही दर्शन घडणार आहे.
Comments
Post a Comment