इकोफ्रेन्डली गणशोत्सव साजरा करताना नवी मुंबईत तब्बल 139 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती जलप्रदूषण टाळण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे आवाहन
नवी मुंबई - पर्यावरणपूरकतेची कास नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच धरलेली असून मोठया प्रमाणावर साजरा होणारा श्रीगणेशोत्सव पर्यावरणाची जपणूक करुन इकोफ्रेंडली स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने नवी मुंबईकर नागरिकांना यापूर्वीच करण्यात आले असून त्याला नागरिकांचा व गणेशोत्सव मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी श्रीगणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्याचा निर्णय जाहीर केला असून त्याचे सर्व गणेशोत्सव मंडळांनी स्वागत केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवामध्ये मंडप उभारण्याकरिता परवानगी मिळण्यासाठी मंडळांना अर्ज करण्यास 18 ऑगस्टपासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात विशेष कक्ष स्थापित करण्यात आला असून मंडळांना विहित कालावधीत परवानगी मिळावी याची खबरदारी घेतली जात आहे.
तलावातील जलप्रदूषण रोखण्यासाठी 14 मुख्य तलावातील जलाशयाच्या साधारणत: 30 टक्के भागात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत गॅबियन वॉल उभारण्यात आल्या असून या विशिष्ट क्षेत्रात नागरिकांनी श्रीमूर्ती विसर्जन करावे आणि जलप्रदूषण रोखावे या आवाहनासही सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या संकल्पनेचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक करण्यात आलेले आहे
Comments
Post a Comment