नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात स्वच्छ सर्वेक्षणाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी सूचनापेटी
पाम बीच - नवी मुंबई शहराची स्वच्छता ही ओळख बनलेली असून हा स्वच्छतेचा ब्रँड आणखी दृढ करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाच्या बळावर नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे. कोणताही नावलौकिक प्राप्त करण्यापेक्षा तो नियमितपणे टिकवणे ही अधिक कठीण गोष्ट असते. त्यादृष्टीने स्वच्छता कार्यातील सुधारणेच्या विचार प्रक्रियेत महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कोणत्याही विधायक उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी होणा-या नवी मुंबईकर नागरिकांनीही सक्रिय सहभागी व्हावे ही भूमिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर नजरेसमोर ठेवली आहे.
या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यदिनी 'स्वच्छतेची थ्री आर त्रिसूत्री' या कार्यक्रमामध्ये नागरिकांशी फेसबुक लाईव्हव्दारे थेट संवाद साधताना आयुक्तांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये वैचारिक लोकसहभाग घेणारा नाविन्यपूर्ण उपक्रम मांडला.
महापालिका अधिकारी / कर्मचारी यांनी आपल्या निवासस्थानाच्या आसपासच्या इमारती व भागातील स्वच्छतेवर बारकाईने लक्ष ठेऊन त्यामधील त्रूटी दूर करण्यासाठी जागरूकतेने काम करावे व 'स्वच्छतेसाठी योगदान देणारा कर्मचारी' बनावे, अशी संकल्पना आयुक्तांनी मांडली व त्याव्दारे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदाचा शहर स्वच्छता कार्यात आणखी प्रभावी रितीने सक्रिय योगदान घेण्याचा नवा संकल्प मांडण्यात आला.
त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने ‘निश्चय केला, नंबर पहिला‘ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नव्या कल्पना, नवे विचार पुढे यावेत व त्याचा उपयोग स्वच्छ सर्वेक्षण कार्याला व्हावा यादृष्टीने महापालिका मुख्यालयात स्वच्छ सर्वेक्षणाबाबत सूचनापेटी लावण्याचे आयुक्तांमार्फत जाहीर करण्यात आले. त्यास अनुसरून महानगरपालिका मुख्यालयात प्रवेशव्दारासमोर दर्शनी भागी सूचनापेटी ठेवण्यात आलेली आहे.
या सूचनापेटीमध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी तसेच नवी मुंबईकर नागरिकांनी 30 ऑगस्ट 2023 पर्यंत शहर स्वच्छता कार्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना, सूचना लेखी स्वरूपात टाकाव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment