9 ऑगस्टला ज्वेल ऑफ नवी मुंबई नेरूळ येथे ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रम
नेरूळ नवी मुंबई - स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या व वीर सैनिकांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश (Meri Maati Mera Desh)’ हे राष्ट्रव्यापी अभियान जाहीर करण्यात आले आहे. यानिमित्त देशभरात प्रत्येक गावशहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वीरांना अभिवादन केले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत शासन निर्देशानुसार 9 ते 14 ऑगस्ट 2023 या कालावधीत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याबाबत शासन स्तरावरुन वेबसंवादाव्दारे झालेल्या विशेष बैठकीत कार्यक्रम आयोजनाविषयी देण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येऊन दिनांक 9 ऑगस्ट रोजी ‘माझी माती माझा देश’ अभियानाच्या विशेष कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, अभियानाच्या नोडल अधिकारी तथा क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, उदयान विभागाचे उपआयुक्त श्री. दिलीप नेरकर, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड व इतर अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत ‘मिट्टी को नमन, वीरों को वंदन’ या संकल्पनेनुसार शहीद आणि वीरांचा नामोल्लेख असणारा शिलाफलक बसविला जाणार आहे. त्याचप्रमाणे मातीचे दिवे अथवा माती हातात घेऊन सकाळी 10.00 वा. पंचप्रण शपथ घेण्यात येणार आहे. याशिवाय स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवाचे औचित्य साधून ‘वसुधा वंदन’ अर्थात 75 देशी वृक्षरोपांची लागवड करून ‘अमृत वाटिका’ तयार केली जाणार असून राष्ट्रध्वजारोहण व राष्ट्रगान संपन्न होणार आहे.
या सर्व अमृत उपक्रमाच्या आयोजनाविषयी विशेष बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली व कार्यक्रमाचे स्थळ आणि वेळ निश्चित करण्यात येऊन प्रत्येक विभागास अनुरूप कामांची जबाबदारी सोपविण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. 9 ऑगस्ट 2023 रोजी, सकाळी 9.00 वा., सेक्टर 26, नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या नवी मुबईतील आयकॉनिक ठिकाणी करण्यात आले आहे.
हे अभियान नवी मुंबई शहराच्या नावलौकिकाला साजेशा पध्दतीने राबविले जावे याकरिता नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी यापूर्वी नियोजनविषयक दोन बैठका घेतल्या आहेत. त्या अनुषंगाने अभियानाची प्रसिध्दी महानगरपालिकेची वेबसाईट, सोशल मिडीया तसेच डिजीटल बोर्ड अशा विविध माध्यमांतून व्यापक स्वरुपात करण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुख्य ठिकाणी मोठया होर्डिंगव्दारे तसेच फ्लेक्स् होर्डिंगव्दारे आणि स्टॅडिजव्दारे अभियानाची प्रसिध्दी करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे नवी मुंबई क्षेत्रात व शेजारील शहरातही प्रवासी सेवा पुरविणा-या एनएमएमटी बसेसवरही फलक प्रदर्शित् करुन ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची माहिती सर्वदूर प्रसारित केली जात आहे.
याशिवाय महानगरपालिका व खाजगी शाळांमध्येही फ्लेक्स होर्डिंगव्दारे अभियानाची प्रसिध्दी करण्यात आली असून शालेय पातळीवरही अभियानांतर्गत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment