शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत क वर्ग महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नंबर वन



मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022’ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘क’ वर्ग महानगरपालिकांच्या गटात नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मुंबईतील एनसीपीए सभागृहात नगरविकास दिनाचे औचित्य साधून आयोजित विशेष समारंभात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार स्विकारला.

याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष ना.ॲड.राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री ना.श्री.दिपक केसरकर, मुख्य सचिव श्री. मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव नगरविकास (2) श्रीम. सोनिया सेठी, अप्पर मुख्य सचिव नगरविकास (1) श्री. भुषण गगराणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इकबाल चहल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्विकारताना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेस क वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्र आणि रु.15 कोटी पारितोषिक रक्कमेचा धनादेश प्रदान करण्यात आला.

राज्य शासनामार्फत शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेस मिळालेला हा राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी होणा-या नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रीय सहकार्यामुळे मिळाला असून हा पुरस्कार नवी मुंबईकर नागरिकांना समर्पीत करीत असल्याचे मत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले. कोणताही पुरस्कार हा चांगले काम केल्याबद्दल प्रोत्साहित करणारा असून त्यासोबतच अधिक चांगले काम करण्याची जबाबदारी वाढविणारा असतो. त्यादृष्टीने यापुढील काळात अधिक जोमाने ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वच्छताकर्मी, अधिकारी – कर्मचारीवृंद, प्रसारमाध्यमे असे सारेजण एकत्रित प्रयत्नांतून संपूर्ण क्षमतेने अधिक उत्तम कामगिरी करतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच राज्यात अग्रभागी राहिली असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये ‘राज्यात प्रथम’ व ‘’देशात तृतीय’ क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेने प्राप्त केलेला आहे. त्याचप्रमाणे कचरामुक्त शहरांच्या कॅटॅगरीमध्ये नवी मुंबईने ‘फाईव्ह स्टार रॅंकींग’ प्राप्त केलेले असून ओडीएफ कॅटॅगरीमध्ये सर्वोच्च ‘वॉटरप्लस’ मानांकन नवी मुंबईने प्राप्त केलेले आहे. विशेष म्हणजे ही मानांकने प्राप्त करणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ 'ला सामोरे जाताना स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडे नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले. शहर सुशोभिकरणाच्या अत्यंत अभिनव व आगळ्यावेगळ्या संकल्पना राबविण्यात आल्या. येता-जाता सहजपणे दृष्टीस पडेल अशाप्रकारे शहराचे रूप अधिक आकर्षक दिसावे, शहराचे वैविध्य जपले जावे तसेच सुंदर दृश्यात्मक साज लाभावा यादृष्टीने महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी भित्तीचित्रांव्दारे, टाकाऊपासून टिकाऊ शिल्पाकृतींव्दारे, आकर्षक कारंजांव्दारे, चित्रकविता भिंतींव्दारे अत्यंत लोभस व लक्षवेधी रुप देण्यात आले.

नवी मुंबईचे स्वरुप इतके आकर्षित करणारे व लक्षवेधी झाले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाखतीत नवी मुंबईच्या शहर सुशोभिकरणाचा कौतुकाने उल्लेख केला.

परदेशात गेल्यानंतर तेथील स्वच्छतेप्रमाणेच सुंदरतेनेही आपण प्रभावित होतो. त्या धर्तीवर सुशोभिकरणाच्या नवनव्या संकल्पना जे.जे., रचना संसद अशा कला महाविद्यालयातील विद्यार्थी चित्रकारामार्फत राबविण्यात आल्या. त्यामुळे शहराचे रूपच बदलून गेले. काही भित्तीचित्रे तर घरी फोटोफ्रेम करून लावावीत, स्क्रीन सेव्हर ठेवावीत इतकी दर्जेदार असल्याचे अभिप्राय नागरिकांकडून उत्स्फुर्तपणे मिळाले. शहर सुशोभित केल्याने परिसर सुंदर दिसतो व यामधून शहराविषयी सकारात्मक भावना तयार होते असेही नागरिकांकडून सांगण्यात आले.

नवी मुंबई शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंती, अंडरपासच्या बाजूच्या भिंती, सोसायटीच्या भिंती, सरकारी इमारतींच्या भिंती, पाण्याच्या मोठ्या जलवाहिन्या यावर आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली. ही भित्तीचित्रे साकारताना येथील मूळ आगरी कोळी संस्कृतीला प्राधान्य देण्यात आले. तसेच परिसराला साजेशी अनुरुप चित्रे काढण्यावर भर देण्यात आला.

त्यानुसार शाळा – महाविद्यालय याबाहेरील भिंती शिक्षणाशी संबंधित विषय घेऊन रंगविण्यात आल्या. उद्यानाजवळील भिंती खेळ आणि पर्यावरणाच्या संदेश देणारे चित्रांनी तर रुग्णालयाजवळील भिंती स्वच्छता आणि आरोग्य सेवा यासंबंधी जाणीव करून देणारी चित्रे रेखाटून सजविण्यात आल्या. यामधील अनेक चित्रे कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आगळ्या वेगळ्या सृजनशील संकल्पनांमुळे अत्युच्च कलाविष्कार प्रदर्शित करणारी ठरली आहेत. अनेक ठिकाणी त्रिमितीय संकल्पना अर्थात थ्रीडी पेंटींग आश्चर्याचा सुखद धक्का देतात.

प्रत्येक शहराची एक ओळख असते. अनेक समुद्र ओलांडत हजारो किलोमीटर प्रवास करून दरवर्षी नवी मुंबईत  येणारे रोहित पक्षी (फ्लेमिंगो) हे नवी मुंबईचे विशेष आकर्षण आहे. या अनुषंगाने ‘फ्लेमिंगो सिटी’ ही नवी मुंबईची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखीत करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी फ्लेमिंगोंची चित्रे रेखाटण्यात आली, शिल्पाकृती लावण्यात आल्या. ज्वेल ऑफ नवी मुंबई या नेरुळ येथील पर्यटकांचे आकर्षण स्थळ असलेल्या ठिकाणी ‘टाकाऊपासून टिकाऊ’ संकल्पनेतून फ्लेमिंगोची 26 फूटी प्रतिकृती उभारण्यात आली.

शहरात वाचन संस्कृतीची जपणूक व्हावी व येताजाता नागरिकांना सहजपणे मराठीतील नामवंत कवींच्या प्रसिध्द कवितांच्या ओळी नजरेस पडाव्यात यादृष्टीने 52 कवींच्या कवितांच्या ओळींना सुयोग्य चित्रांसह चितारत चित्र कविता भिंती साकारण्यात आल्या आहेत. या अभिनव उपक्रमाची दखल महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांप्रमाणेच नवी मुंबई शहराबाहेरील नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली.

शहरातील अनेक चौकात व वर्दळीच्या ठिकाणी टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या आकर्षक शिल्पाकृती उभारल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली. तलावांच्या सुशोभिकरणावर भर देत जलाशयापर्यंतचा आतील भाग आकर्षकरित्या रंगविणयात आला व काही तलावांमध्ये विद्युत रोषणाई देखील करण्यात आली. नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये व शहरातील नैसर्गिक नाले स्वच्छ रहावेत याकरिता नाल्यांच्या काठांवर उंच जाळ्या बसविण्यात आल्या व त्यावरही आकर्षक चित्राकृती प्रदर्शित करण्यात आल्या. तसेच नाल्यांच्या प्रवाहामध्ये स्क्रीन बसवून नाले नेहमी स्वच्छ राहतील याची उपाययोजना करण्यात आले..

शहरातील धूळीचे प्रदूषण टाळण्यासाठी दुभाजक, चौक याठिकाणी कांरजे लावण्यात येऊन या कारंज्यांना पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी वापरून पिण्याच्या पाण्याची बचत करण्यात आली. सुशोभिकरण करताना नवी मुंबई शहरातून प्रवास करणा-या नागरिकांचा विचार करून सायन पनवेल महामार्ग तसेच रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी रेल्वे मार्गांच्या दोन्ही बाजूस भित्तीचित्रांव्दारे रंगकाम करून शहराचे रूप बदलण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले.

महानगरपालिका क्षेत्रातील उड्डाणपूल, पादचारी पूल, सब वे अत्याधुनिक वॉल मिडिया प्रकारात सजविण्यात आले असून आकर्षक विदयुत रोषणाई करण्यात आलेली आहे. दर्शनी भागातील मोकळया जागा, कॉर्नर्स याठिकाणी जुनेटायर, बॉटल कॅप्स तसेच भंगार साहित्य वापरून वेस्ट टू वंडर शिल्पाकृती बसविण्यात आलेल्या आहेत. शहरातील काही उड्डाणपुलांना थ्रीडी रंगकाम करण्यात आलेले असून सकाळप्रमाणेच रात्रीच्या वेळीही ही चित्रे नेत्रसुखद वाटतात. यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झालेली असल्यामुळे ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना शहरामधील मुख्य रस्त्याच्या चौकांमध्ये लक्षवेधी फलक प्रदर्शित करण्यात आले.

स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असून त्याला सुशोभिकरणाची जोड मिळाली तर शहर अस्वच्छ करण्याची मानसिकताच निर्माण होणार नाही या भूमिकेतून केवळ काही चौक व मुख्य जागा यापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण शहरात सुशोभिकरणाचे व्यापकत्व प्रदर्शित व्हावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने शहर सुशोभिकरणावर लक्षणीय भर दिला. शहराला विविध कारणांनी भेटी देणा-या प्रवासी नागरिकांकडून या बदललेल्या आकर्षक रुपाची विशेष नोंद घेतली गेली तसेच शहराविषयी नवी मुंबईकर नागरिकांच्या मनात असलेला अभिमान अधिक वृध्दींगत झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

याचेच परिणामस्वरूप म्हणून नगरविकास दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022’ मध्ये ‘क’ वर्ग महानगरपालिकांच्या गटात नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..