समाजसेवक संतोष सुतार यांची तक्रार.. चांगल्या रस्त्याचे डांबरीकरण करून जनतेचा पैसा वाया... कंत्राटदाराचे कल्याण ...जनतेचे नुकसान
नवी मुंबई = नवी मुंबईच्या शिरवणे परिसरात अनावश्यक विकास कामांवर मोठा वाद उफाळला आहे. चांगल्या स्थितीतील रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण करून जनतेच्या कररूपी पैशाचा अपव्यय केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. स्थानिक जनसेवक संतोष सुतार यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.
चांगल्या रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण – जनतेच्या पैशाचा अपव्यय
शिरवणे येथील मोरया मार्बल ते टिंबर मार्केट दरम्यानच्या रस्त्याचे काम नुकतेच पुन्हा हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याची स्थिती चांगली असूनही त्यावर पुन्हा डांबरीकरण केले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
करदात्यांच्या पैशाचा अपव्यय – संतोष सुतार यांची तीव्र प्रतिक्रिया
जनसेवक संतोष सुतार यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आरोप केला की, "नवी मुंबई महानगरपालिका जनतेचा कररूपी पैसा कंत्राटदारांच्या घशात घालून अनावश्यक विकास कामांवर उधळपट्टी करत आहे. चांगल्या स्थितीतील रस्त्यांचे पुन्हा काम काढणे म्हणजे सरळ सरळ टक्केवारीच्या गणितातील भ्रष्टाचार आहे."
नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
स्थानिक नागरिकांनी देखील या अनावश्यक विकास कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "गरज नसताना रस्त्याचे पुन्हा काम काढून करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होणे हे निंदनीय आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. करदात्यांचा पैसा योग्य कामांवर खर्च न करता अनावश्यक प्रकल्पांवर वापरला जात असल्याचे चित्र उभे राहिले आहे.
सखोल चौकशीची मागणी
संतोष सुतार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनाला नागरिकांच्या पैशाचा योग्य वापर करावा, अशी आग्रही मागणी केली आहे.
---
Comments
Post a Comment