नेरूळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धरमशी पटेल यांचे आवाहन.... ‘बॅन चायना’ मोहिमेची घोषणा... पाकिस्तानला युद्धमदत करणाऱ्या चीनचा केला जाहीर निषेध
नेरूळ नवी मुंबई – भारत-पाकिस्तान युद्धात चीनने पाकिस्तानला हात दिल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनी ‘बॅन चायना’ मोहीम सुरु केली आहे. नेरूळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धरमशी रावरीया पटेल यांनी या मोहिमेचे नेतृत्व करत सर्व व्यापाऱ्यांना चीनमधून येणाऱ्या वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नवी मुंबईसह भारतातील सर्व व्यापाऱ्यांना चायना प्रॉडक्ट खरेदी न करण्याचेही आवाहन केले आहे.
नेरूळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धरमशी पटेल यांचा चायना मालावर बहिष्कार
रावरीया पटेल यांनी सांगितले की, ‘चायना माल विक्रीमुळे अप्रत्यक्षरीत्या भारतातील मोठा पैसा चीनच्या तिजोरीत जातो. हा पैसा युद्धात पाकिस्तानला बळकट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यामुळे देशभक्ती आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून चायना मालावर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे.’
स्थानिक उत्पादनांना प्राधान्य
नेरूळ व्यापारी असोसिएशनने व्यापाऱ्यांना स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भारतीय उत्पादकांचे समर्थन करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. स्थानिक उद्योगांना मजबूत करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर जोरदार प्रचार
या मोहिमेचा प्रचार सोशल मीडियावरही जोरदारपणे करण्यात येत आहे. ग्राहकांनाही चायना प्रॉडक्टच्या वापरावर विचार करावा आणि देशाच्या आर्थिक सुरक्षेसाठी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे सांगण्यात आले आहे.
व्यापाऱ्यांचा निर्धार बॅन चायना
‘आपल्याला देशाच्या आर्थिक सुरक्षेसाठी एकत्र येणे आवश्यक आहे. चीनच्या उत्पादनांवर निर्भरता कमी करणे आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे हाच देशभक्तीचा खरा अर्थ आहे,’ असे रावरीया पटेल यांनी सांगितले.
अशा प्रकारे व्यापारी समुदायाने चीनविरोधात उचललेल्या या पावलामुळे स्थानिक उद्योगांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment