लेखक प्राध्यापक डॉ. केशव साठ्ये यांच्या "'माध्यमांतील दिवस" या पुस्तकाचे माजी न्यायाधीश जी डी पारेख यांनी केल परीक्षण..
पुणे (लेखक परीक्षक माजी न्यायाधीश जी डी पारेख) : माध्यम संक्रमणाचे समृद्ध आणि सूरेल समालोचन: अमोल पालेकरांचा दृश्यकला , रंगभूमी व चित्रपटांतील विलोभनीय आणि समृद्ध प्रवास मनात रेंगाळत असतानाच असाच मन गुंतूंन ठेवणारा दर्जेदार ऐवज इतक्या लवकर हातात पडेल असे वाटले नव्हते. परंतु अचानक माझे ‘ समाज- माध्यमातील ’ मित्र डॉ. केशव साठये यांचे ' माध्यमांतले दिवस ' अनुभवण्यासाठी येण्याचे आमंत्रण आले. कला, संगीत, लेखक , कवी, चित्रकार , पत्रकार , अभ्यासक , शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींचे संक्षिप्त चित्रण करणारे ' भिनलेली माणसं ' हे डॉ . केशव साठये यांचे पुस्तक अलीकडेच तीनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. ते पुस्तक त्यांच्या कडून प्रथम घेणारी व्यक्ती मीच होतो आणि योगा योगाने 'माध्यमांतले दिवस ' या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा पहिला लाभार्थीही मीच आहे. माध्यमांतील दिवस हे पुस्तक लेखकाने चार दशकांच्या प्रवासात घेतलेल्या वैविध्यपूर्ण अनुभवांचा कॅलिडोस्कोपच आहे. पत्रकारितेचे धडे घेण्यासाठी रानडे इन्स्टिटयूट मध्ये दाखल झाल्यापासून जाहिरात क्षेत्र, मुंबई दूरदर्शन , बालचित्रवाणी , महर्षी कर्वे शिक्षण संस्था,टिळक महाराष्ट्र विद्यापीठापर्यंत लेखकाबरोबर आपणही कसा संचार करतो ते कळतच नाही. इतकेच नव्हे तर रुपाली हॉटेल मध्ये त्यांच्या बरोबर कॉफी घेतल्याचा,डेक्कन क्वीन मधून प्रवास केल्याचा , सवाई गंधर्वची मैफिल ऐकल्याचा आणि फिल्म इन्स्टिटयूट मध्ये कलात्मक पाश्चात्य सिनेमे पाहत असल्याचा अनुभव आपण घेत राहतो. पुरुषोत्तम करंडकाच्या नाट्यस्पर्धांतही आपण सामील होतो आणि श्री केशवराव कोठावळे यांनी सुरु केलेल्या साहित्यिक गप्पांतही (मॅजिस्ट्रीक गप्पा) आपण रंगून जातो. . वर्षभर पुण्यातील जाहिरात क्षेत्रात काम करुन मुंबई दूरदर्शन मध्ये निर्मिती सहाय्यक म्हणून कार्यरत झाल्यानंतर श्री साठये यांच्या माध्यमकर्मी कारकिर्दीला खरा बहर येऊ लागला. त्यांच्या कला गुणांना वाव मिळाला.
"प्रतिभा आणि प्रतिमा ' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या निर्मितीत सहभागी होण्याची संधी मिळाली. विजय तेंडुलकरांपासून ते दुर्गा खोटे यांच्यापर्यंत तर कविवर्य ग्रेस पासून ते हृदयरोग तज्ज्ञ श्री जी. बी. परुळकर यांच्या पर्यंतच्या अनेक दिग्गजांच्या आठवणी यात शब्दबद्ध केल्या आहेत .लता मंगेशकर , हृदयनाथ मंगेशकर,,सुरेश वाडकर,जितेंद्र अभिषेकी अशा अनेक श्रेष्ठ आणि जेष्ठ कलाकारांची गाणी दूरदर्शनच्या पडद्यावर झळकली त्या ‘सह्याद्री’च्या पाऊलखुणा इथल्या पानांपानातून दरवळल्या आहेत. आपल्या वरिष्ठांमध्ये किंवा सहकार्यांामध्ये काहीतरी कमतरता आहे , खोट आहे असे बोलण्याची , लिहिण्याची किंवा सूचित करण्याची माणसाची साधारणतः प्रवृत्ती असते परंतु साठये यांच्या संपूर्ण लेखनात असे कोणतेही दोषारोप नाहीत उलट त्यांच्या या प्रवासात ज्या ज्या माणसांशी त्यांचे संबंध आले , परिचय झाला,सहकारी म्हणून काम केले त्या बहुतेक माणसांशी त्यांचा ' मैत्र ' जमलेलं दिसते.
त्यांचा एक सहकारी चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा ' जयंत ओक ' संबंधी सांगताना ते म्हणतात, द्रौपदीसाठी जसा कृष्ण उभा राहिला तसा संकटमोचक किंवा हर दर्द की दवा असा चालता बोलता कैलास जीवन म्हणून तो वावरला. अवधूत परळकर हा त्यांचा मित्र म्हणजे लहान मुलाच्या निरागसतेने थयथयाट करणारा निरोगी आणि पारदर्शी वाद घालणारा एक विरळ गृहस्थ म्हणून आपल्याला इथे भेटतो. भाषेवर प्रभुत्व असणारा व कोटी करण्यात पटाईत असणारा सुरेश वैद्य या त्यांच्या मित्राच्या करामती ऐकताना आपणही त्या आठवणीत रंगून जातो. प्रशांत कोठडिया या मित्राच्या साधेपणाबद्दल आणि सच्चेपणाबद्दल लेखकानी केलेले कौतुक अतिशय वाचनीय झाले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी रंगवलेली सर्वच व्यक्तिचित्रे कमालीची बहारदार झाली आहेत.
डॉ. साठये यांच्या मनात एक ' जिप्सी ' कायम वास करून होता. कंटाळा येईपर्यंत एखाद्या ठिकाणी चिकटून राहण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. एकाच पठडीतील आणि स्टीरीओटाइप काम करण्याचा त्यांच्या कलात्मक मनाला कंटाळा येणे साहजिक होते. दूरदर्शन पेक्षा अधिक क्रियाशील आणि कलात्मकतेचा कसोटीला उतरणारे बाहेरचे जग त्यांना खुणावत होते. दुसरी नोकरी हातात नव्हती मोठा बँक बॅलन्सही नव्हता तरी त्यांनी निर्णय घेतला आणि दूरदर्शन सोडून पुण्याकडे प्रस्थान ठेवले. बालचित्रवाणीच्या माध्यमातून पुस्तकातील धड्यांच्या बाहेर जाऊन जिथे संस्कार, शिक्षण, मूल्ये दिसतील ते टिपण्याची मुभा घेत ते शैक्षणिक दूरचित्रवाणी विश्वात कार्यरत राहिले . मुलांच्या कार्यक्रमासाठी विषय निवड आणि कार्यक्रमात रूपांतरित करता येईल अशी आशय बांधणी हे अवघड काम असते.पाच-पाच वेळही पटकथा पुनर्लेखन करण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. साठये म्हणतात ‘शिक्षक या अद्भुत रसायनाची ओळख या सृजन यात्रे निमित्ताने झाली’. शैक्षणिक दूरचित्रवाणीचे नेमके सामर्थ्य काय हे समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
कामातील तोच तोचपणा आणि शासकीय स्तरावरील उदासीनता या मुळे डॉ. साठये यांच्या मनातील ' जिप्सीने ' पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि. ' फ्रिलान्सर ' म्हणून त्यांनी काम सुरू केले .विविध डॉक्युमेंट्री करत असताना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे तर्फे स्त्रियांसाठी माध्यम शिक्षण संस्था सुरु करण्यासाठी त्यांना बोलवण्यात आले. स्मार्ट असे संस्थेचे नामकरण करुन मुलींसाठी खास प्रसार माध्यम शिक्षण अभ्यासक्रमाची आखणी त्यांनी केली. अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रम , व्याख्याने,प्रात्यक्षिके ,फिल्म निर्मिती स्पर्धा या माध्यमांतून विद्यार्थीनींच्या सर्जनशीलतेला ऊर्जा पुरवण्याची कामगिरी त्यांनी समर्थपणे पार पाडली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यम शिक्षण विभागाची धुरा सध्या ते वहात आहेत विद्यापीठाचा शतकी वारसा जपण्याचा आणि अनुभव समृद्ध विद्यार्थी घडवण्याचा त्यांचा आग्रह या पुस्तकातून स्पष्टपणे साकार झाला आहे.
' दूरदर्शन ' मधील सहा दशकांतील स्थित्यंतराचा साठये यांनी घेतलेला मागोवा,माध्यमांतील बदलत्या वाऱ्यांचे वेध, कृत्रिम बुद्धिमत्तेची घेतलेली दखल आणि प्रसार माध्यमांतील शिक्षणाच्या नव्या दिशा आणि एकंदरीतच माध्यम विश्वाबद्दलचे स्वानुभावावर आधारलेले मूलगामी चिंतन मुळातूनच वाचण्यासारखे आहे. दूरदर्शनच्या कृष्णधवल कार्यक्रमाचा ७२- ८२ चा पहिला टप्पा त्या नंतर दूरदर्शन हे लोकप्रियतेच्या अतुच्च शिखरावर झालेला दुसरा टप्पा , परदेशी वाहिन्यांशी स्पर्धेचा तिसरा टप्पा आणि कंत्राटी मंडळाच्या ताब्यात सूत्रे गेलेला नंतरचा चौथा टप्पा अशी विभागणी साठये करतात. साहित्य, संस्कृती , ललितकला , संगीत या विषयांवर उत्तम कलाकृती करून दूरदर्शनने गेल्या पन्नास साठ वर्षांत दिलेल्या योगदानाची दखल साठये आवर्जून घेतात.परंतु खाजगी वाहिन्यांच्या सुळसुळाटामुळे या दृश्य माध्यमांचे व्याकरणच आता बदलून गेले आहे अशी खंत व्यक्त करतात. टीआरपीच्या आधारे मालिकेचा दर्जा ठरवणे ,मालिकांचे अर्थकारण आणि सत्वर मागणी या बाबी दृश्यमाध्यमांच्या भाषा, दिग्दर्शन, कलात्मकता यांच्या काटेकोर पणावर मर्यादा आणतात असे आपले अनुभवी निरीक्षणही नोंदवितात.
ट्विटर,फेसबुक हि समाज माध्यमांतील विविध आयुधे आणि वॉट्सअप हे माध्यम फारसा विचार न करता आपण वापरत आहोत. त्यांच्या दृष्टीने ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. संवादाची म्हणून ओळखली जाणारी माध्यमे आता विसंवादाची माध्यमे म्हणून समोर येऊ लागली आहेत याची त्यांना अधिक खंत आहे. चॅटजीपीटी सारख्या साधनांच्या घुसखोरीमुळे प्रतिभावंत लेखक,चित्रकार, संगीतकार यांच्या कला कौशल्याला मागणी कितपत राहणार अशी शंकाही ते व्यक्त करतात. या परिस्थितील कलात्मकता आणि सर्जनशीलता याचे नवे आयाम आपल्याला प्रस्थापित करावे लागतील हे सूचनही ते करतात. या नव माध्यमांच्या मयसभेत पाय न घसरता चालण्याची क्षमता आणि अस्सलतेचा आस्वाद घेण्याची उच्च मानसिकता हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कला क्षेत्रातील घुसखोरांवरचा उपाय ठरू शकेल हा आशावाद यात व्यक्त झाला आहे.,मागील पिढीने तसेच समाजमाध्यमानी वेढलेल्या समकालीन पिढीनेही माध्यम विश्वातल्या या प्रवाही समालोचनाचा अवश्य आस्वाद घ्यावा.प्रस्तावनेत श्रीमती करुणा गोखले यांनी म्हटल्याप्रमाणे साठये यांचे लेखन प्रसार माध्यमांतील महत्वपूर्ण घटकांचा दस्तऐवज आहे याचा अनुभव देणारी ही साहित्यकृती आहे. हा ऐवज तरुण पिढीसाठी माहितीपर -रंजक आणि आमच्या पिढीसाठी स्मरण रंजनाचा आनंद देणारा आहे. आणि म्हणूनच तो संग्राह्य आहे. परीक्षण माजी न्यायाधीश जी डी पारेख
माध्यमातील दिवस या पुस्तकाचे लेखक यांचा परिचय : डॉं केशव साठये हे १९८१ पासून दूरचित्रवाणी आणि प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रथम दूरदर्शन आणि त्यानंतर बालचित्रवाणी माध्यमातून त्यांनी ५०० च्यावर दूरचित्रवाणीमाहितीपट ,मालिकांची,कार्यक्रमांची निर्मिती केली आहे . राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्याथेट प्रसारणातही ते सहभागी झाले आहेत . सकाळ ,महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात ते नियमित लेखन करत असून सध्या ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास कॉम विभागाचे प्रमुख आहेत .
Comments
Post a Comment