शपथविधी होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
मुंबई - महायुती सरकारचा नुकताच शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात पार पडला. यावेळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. शपथविधी होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार अन् एकनाथ शिंदे थेट मंत्रालयात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मंत्रालयात घडामोडींना वेग आला आहे. तीनही नेते मंत्रालयात पोहोचले आहेत. यावेळी मंत्रालयाच्या गेटवर स्वागतासाठी सजावट करण्यात आली होती. तीनही नेते मंत्रालयाच्या गेटवर दाखल होताच लाडक्या बहिणींनी तीनही नेत्यांचं औक्षण केलं. दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दालनावरील एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणूनची पाटी बदलून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. तर देवेंद्र फडणवीस यांची पाटी असलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या दालनाबाहेर एकनाथ शिंदे यांची पाटी लावण्यात आली.
Comments
Post a Comment