नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ संस्थेचा शुभारंभ संपन्न




 नेरूळ नवी मुंबई - पवित्र नवरात्रोत्सवाच्या मंगल समयी सप्तमीच्या सातव्या माळेला, आज शनिवार, २१ ऑक्टोबर २०२३ रोजी, उपरोक्त संस्था स्थापनेचा शुभारंभ सोहळा स्टर्लिंग कॉलेज, नेरुळ, नवीमुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होताना ज्ञानदीप विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गायलेल्या सुरेल स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाल्याने वातावरण प्रसन्न झाले.

सुत्रसंचालक घनश्याम परकाळे यांनी 'नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ,' नवीमुंबई. या नियोजित संस्था उभारणी मागील भूमिका आणि भविष्याकालीन उदिष्ट्ये उद्धृत करीत संस्थेची क्रियाशीलता वर्धमान होण्यासाठी आजीव सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन केले.

आम्ही सरस्वतीचे पुजारी आज विश्वासाने एक नवीन पाऊल उचलत आहोत. नेरुळ-सीवूड, नवीमुंबई परिसरामध्ये विविध कला आणि सांस्कृतिक सृजनतेला वाव देण्यासाठी पूर्णवेळ कार्य करणाऱ्या संस्थेची उणीव भासत असल्याचे जाणवत आहे. या क्षेत्रामधील नवोदित प्रतिभेचा शोध घेऊन त्यांचा नामवंत सृजनशील प्रतिभावंत मान्यवरांशी स्नेहबंध स्थापित करण्याच्या उदात्त हेतूने ही संस्था कार्य करेल. प्रामुख्याने साहित्य, संस्कृती, कला आणि पर्यावरण क्षेत्रामधील सृजनशील साहित्यिक, महिला, युवा आणि पर्यावरण ह्या पातळीवर कार्यरत असलेल्या व्यक्ती संस्था यांच्याबरोबर सातत्यपूर्ण संवाद ठेवून समृद्ध सामाजिक अभिसरण घडविणे हे संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट असेल अशी माहिती दिली. साहित्य संस्कृती आणि कला अशा त्रिवेणी संगमाचे अभिसरण घडविणाऱ्या या संस्थेची स्थापना इतर साहित्यिकांच्या सहकार्याने करीत आहोत. गुरुवर्य ते मित्रवर्य आणि नवीमुंबई मधील कला क्षेत्रातील सहृदयी मान्यवरांचे सक्रिय सहकार्य नेहमीच लाभत असते. परंतु ह्या वेळेस आपल्या सर्वांचे सहकार्य, शुभेच्छा आणि मार्गदर्शन लाभावे ही मन:पूर्वक इच्छा प्रकट केली.

सन्माननीय डॉ. प्रा. अजित मगदूम सरांच्या शुभहस्ते नियोजित 'नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ' ह्या संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण होऊन संस्थेचा विधीवत शुभारंभ संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवीमुंबई केंद्र, सन्माननीय डॉ. अशोक पाटील सर तसेच प्रमुख अतिथी शिवसेना, उपशहरप्रमुख श्री. समीर बागवान साहेब आणि श्री. अरविंद वाळवेकर सर ह्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. नवरंग संस्थेच्या पहिल्या कार्यकारिणीची ओळख करुन देताना कार्यवाह श्री. घनश्याम परकाळे यांनी अध्यक्ष श्री. गज आनन म्हात्रे, कोषाध्यक्ष्य श्रीमती पाकिजा आत्तार, उपाध्यक्ष श्री. महादेव देवळे, कार्यकारिणी सदस्य श्री. श्यामराव सुतार, श्री. अनिल मुनघाटे आणि सौ. नवदुर्गा पवार यांचा परिचय करून दिला.

या प्रसंगी बोलताना सर्व मान्यवरांनी नियोजित संस्थेला मनापासून शुभेच्छा देताना श्री. अजित मगदूम सरांनी आपल्या भाषणामधे भविष्यात ज्या संस्थेचा 'ऐतिहासिक' म्हणून उल्लेख होईल अशा ‘नवरंग’ संस्थेच्या शुभारंभ झाल्याची घोषणा करताना, मला हा सन्मान लाभल्याचे आनंदी प्रतिपादन करताचं, सभागृहातील उपस्थित श्रोत्यांनी उस्फुर्त टाळ्यांनी दाद दिली. श्री. समीर बागवान साहेबांनी आज स्थापना झालेल्या नवरंग संस्थेचा दिवसेंदिवस उत्कर्ष होईल याची ग्वाही देत शुभेच्छा दिल्या. श्री. अरविंद वाळवेकर सरांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा गतकाळातील साहित्य आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता अल्पावधीतच ही संस्था काही दर्जेदार कार्यक्रम घेऊन येईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

या सोहळ्यास श्रीमान आप्पा ठाकूर, सौ. वृषाली मगदूम, श्री. सर्जेराव कुइगडे, श्री. विकास साठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. नवोदित कवी, कवयित्री आणि साहित्यिकांच्या साक्षीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे कार्यवाह श्री. घनश्याम परकाळे यांनी ओघवते सुत्रसंचालन केले.

उत्तार्धात 'नवरंग' संस्था स्थापनेच्या मुहूर्तावर आयोजित केलेल्या पहिल्याच कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक श्री. गज आनन म्हात्रे यांच्या 'खाडीवरची माडी' ह्या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक पाटील, डॉ. प्रा. अजित मगदूम, श्री. समीर बागवान, श्री. अरविंद वाळवेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. ह्या प्रसंगी झालेल्या चर्चासत्रामध्ये, श्री. रत्नाकर तांडेल सर, ज्ञानदीप विद्यालय, करवेगाव; ज्येष्ठ साहित्यिक श्री. सर्जेराव कुइगडे तसेच श्री. अरविंद वाळवेकर; अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, नेरुळ यांनी सहभाग नोंदवला.
प्रास्ताविकात लेखक श्री. गज आनन म्हात्रे यांनी, कोरोना काळात लिहिल्या गेलेल्या ह्या कादंबरी लेखणामागील त्यांची भावना आणि वाचकांना भावलेल्या या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीची निकड कथन केली.

श्री. रत्नाकर तांडेल सरांनी, नवीमुंबईची तेव्हाच्या भोगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक श्रीमंतीची उजळणी करीत कादंबरीतील बारकावे कथन केले. अरविंद वाळवेकर सरांनी कादंबरीमधील व्यक्तिरेखांची स्वभाव वैशिष्ट्ये उद्धृत केले. ह्या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ नागरिक संघामध्ये झाल्याचे स्मरण करुन देताना, भविष्यात आणखी आवृत्या निघतील अशी प्रसंशा केली. सर्जेराव कुईगडे यांनी कादंबरीचे विस्तृत परीक्षण करताना कादंबरीतील काही प्रसंगाची माहिती दिली. श्री. अजित मगदूम सरांनी अल्पावधीतच म्हणजे फक्त पाच महिन्यात दुसरी आवृत्ती निघण्याचे भाग्य लाभलेल्या या प्रवाही कादंबरीमधील सहजगुण, वाचकांना संमोहित करणारी लेखनशैली याविषयी बोलताना ही कादंबरी वाचताना कथानायक, निवेदक अर्थात कादंबरीचा नायक अर्जुन त्याच्या गतायुष्यामध्ये रुजलेल्या प्रेमभावानेचा अंकुर आणि तद्नुषंगिक कथाविष्कार सांगताना, पानोपानी सहजगत्या प्रतीत झालेली निसर्गरम्य विविधता कौतुकास्पद आहे आणि एखादा जीवनपट उलगडत जावा अशी गोष्ट आपल्यासमोर येत असताना वेळोवेळी ही ‘खाडीवरची माडी’ त्याची साक्ष देत राहते, याकडे लक्ष वेधताना ह्या कादंबरची मांडणी एखाद्या पटकथेप्रमाणे आहे आणि यावर चांगला चित्रपट बनु शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणामध्ये यशवंतराव प्रतिष्ठान केंद्र, नवी मुंबई संस्थेचे सचिव सन्माननीय डॉ. अशोक पाटील सर यांनी श्री. गज आनन म्हात्रे लिखित कादंबरी आणि 'नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ' या संस्थेला शुभेच्छा देताना भविष्यामधील संस्थेच्या उपक्रमांना आपले नेहमीच सहकार्य राहील, अशी स्नेहपूर्ण ग्वाही दिली. सूत्रसंचालक श्री. घनश्याम परकाळे यांनी ह्या कार्यक्रमासाठी वाशी येथून आलेले छायाचित्रकार श्री. संतोष थळे आणि अगदी ऐनवेळी ध्वनी संयोजनाची व्यवस्था उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री. भागवत यांचे विशेष आभार मानले.

कार्यक्रमाचा समारोप करताना, नवरंग संस्थेचे सन्माननीय कार्यकारिणी सदस्य श्री. अनिल मुनघाटे यांनी व्यासपीठावरील आणि सभागृहातील सर्व मान्यवर रसिक श्रोते यांचे आभार प्रकट केल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

सुनील पारकर यांचे आयुक्तांना निवेदन... कोपरखैरणे येथील चिकनेश्वर उद्यानाच्या प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विनंती

Global music Star Holly natasja Live on News now.